सुचते ती...
कधी चोर पावलांनी अलगद येते,
हृदयाची सल नकळत सुखद दुखते...
स्फुरते कधीही अस्वस्थ करते,
रेखाटता पानावर सुंदर हसते...
मागणे शब्दांचे चंद्र सूर्यास मागते,
लाडावते कधी रुसून बसते...
गर्दित सूचते मनाचे कवाड उघडते,
चांदण्याचे कवडसे गवाक्षातून डोकावते...
धगधगते विझते विझून जळते,
ठिणगी पेटवून धुरांडे उडवते...
वावटळ आकांत काळजातून फुटते,
डोळ्यांतून वाहते हृदयातून पाझरते...
स्पंदनांना जखमी करते रक्ताळते,
खुशीत रमते निवांती हसते...
निरागस बाळांचे बोल बोलते,
महंताचे उपदेशांचे किर्तन करते...
मंदिरात अभंग स्वर गुंजते,
रिमझीम पावसात झरते...
ती सुचते स्वच्छंदी मी लिहीते,
मुक्तछंद माझा तिला मी कविता म्हणते...
जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा